नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्र पर्यायाने नाशिक जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी अडविण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन खान्देशसह नाशिक, अहमदनगर ही जिल्हे कायमची दुष्काळमुक्त करण्यात येतील. पुढील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाला बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
डोंगरे वसतिगृह मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ.राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने मागील वर्षभरात राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बॅंक राज्यातील 10 हजार गावांमध्ये ॲग्री सोसायटी स्थापन करण्यास शासनाला मदत करणार आहे. निओ मेट्रोच्या कामाला ही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी योजनेत शासकीय योजनांच्या लाभाचा कुंभमेळा भरला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.