नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘योजना कल्याणकारी, सर्व सामान्यांच्या दारी’ या टॅग लाईनला साजेशा शासनाच्या वेगवान अंमलबजावणीमुळे शासकीय योजनांचा जलद लाभ मिळाल्याने जगण्यास बळ व उभारी मिळाली .” अशा भावना सर्वसामान्य शेतकरी, महिला, शाळकरी मुली, कष्टकरी , बांधकाम कामगारांनी शासन आपल्या दारी नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमात आलेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पतीने दिली पत्नीला साथ सांगितला शासनाचा लाभ:- अर्चना पिंगळे, देहरेवाडी, ता.दिंडोरी
मी अर्चना सागर पिंगळे, राहणार देहेरेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक एवढेच बोलून अर्चनाताईंना अचानक भरून आलं. तेवढ्यात त्यांचे पती सागर पिंगळे यांनी पुढे येऊन सांगितले की, शासनाच्या कृषी विभागाकडून माझ्या पत्नीला १२ लाख १० हजाराचा लाभ मिळाला. या अनुदानातून शेडनेटची उभारणी केली. यातून शिमला मिरचीचे खूप चांगले उत्पन्न मिळाले. अनुदानाचे पाठबळ मिळाल्याने खूप उभारी आली असून शासनाने सदैव असेच पाठीशी रहावे,अशी कृतज्ञ भावना श्री. पिंगळे यांनी व्यक्त केली.
शासनाच्या मदतीने उभारलेल्या हनीबी फार्म चा गोडवा सातासमुद्रापार नेणार -विष्णुपंत गायके,पळसे, ता.नाशिक
समूह शेती गटातंर्गत शासनाकडून अनुदान मिळाले. या अनुदानातून आमच्या कंपनी मार्फत गुळाची निर्मिती केली जात असून १०० टक्के केमिकल विरहित गुळ आहे. आतापर्यंत आमच्या कंपनीने १०० टन गुळाची निर्मिती केली आहे. तसेच आमच्या गुळाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात मागणी असून त्याबाबत पुढील नियोजन चालू आहे, असे मत नाशिक हनी फार्म प्रोड्युसरचे अध्यक्ष श्री गायखे यांनी व्यक्त केले.
मातृत्वाचा सन्मान करणारं शासन :- आरती वाघेरे, सोमेश्वर,ता.नाशिक
हिरकणी कक्षाची सोय करून शासनाने मातेचं मातृत्व जपलं आहे, अशी भावना सोमेश्वर येथील आरती वाघेरे यांनी व्यक्त केली. आपल्या आठ महिन्याच्या गोड आरोहीला त्या स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्षात घेऊन आल्या होत्या. अनेक भव्य दिव्य कार्यक्रमात सगळ्या सोयी असतात परंतु स्तनदा मातेचा सहसा विचार होतांना दिसत नाही. परंतु नाशिक येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात शासनाने हिरकणी कक्ष उभारून स्तनदा मातांसाठी सोय केली आहे. अशी सोय प्रत्येक कार्यक्रमात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून व्यवसायाला चालना:- कृषीरत्न श्री. शिवनाथ बोरसे,भोयेगाव ता. चांदवड
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (PMFME) माध्यमातून 16 लाखाचे कर्ज घेऊन कांदा फ्राय करण्यासाठी आवश्यक असणारे युनिट विकत घेतले. फ्राईड कांदा, कोरडा कांदा, गोडा मसाला, खजूर, चिंच, द्राक्ष इत्यादी पासून मूल्यवर्धित व टिकाऊ पदार्थ तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा आणखी विस्तार करण्याचा विचार असून याचे मोठ्या प्रमाणावर मार्केटींग देखील करणार आहे. शासनाने योग्य वेळी केलेल्या मदतीमुळे मला काम करण्यासाठी व उद्योग वाढीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे शासनाचा खूप खूप आभारी आहे, अशी भावना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील कृषीरत्न शिवनाथ बोरसे यांनी व्यक्त केली.
शासनाच्या मदतीमुळे बचतगट अधिक सक्षमतेने काम करणार :-राधा सज्जन दोंदे, म्हसरुळ, जि.नाशिक
स्वयं रोजगार कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत म्हसरूळ येथील आसरा महिला बचत गटाला 15 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरीत करण्यात आला. या मदतीमुळे आमच्या पापड व्यवसायाला गती मिळाली असून आमचा आसरा महिला बचत गट शासनाच्यामदतीने यापुढेही चांगले काम करुन महिलांना स्वयंपूर्ण करेल, अशी भावना म्हसरूळ येथील राधा सज्जन दोंदे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात फिरुन ‘मिलेट रथ’ करणार जनजागृती :- शशिकांत बोडके,पळसे, नाशिक
आतंरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-2023 या अनुषंगाने संपूर्ण भारतभर मिलेटस् व मिलेटसच्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार होत आहे. त्याच माध्यमातून मिलेटसपासून वेगवेगळी प्रक्रिया राबवून पदार्थ बनवले आहे. त्यात ज्वारी असलेली ज्वारीची बाकरवडी, नागली, बाजरी, ज्वारीची पुरी असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. तृणधान्याच्या पौष्टीकतेबाबत जनजागृती होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिलेट रथ’ फिरुन जनजागृती करणार आहे, अशी माहिती शशिकांत बोडके यांनी दिली.
सामान्यांचे शासन असल्यामुळे मिळाला शेतीपुरक व्यवसायाला हातभार:- संजय महादू निर्मळ, लहवित ता. जि. नाशिक
मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असून माझे शिक्षण बी.ए पर्यंत झाले आहे. शेती व्यवसाय करत असताना शेतीला पूरक व्यवसाय असायला पाहिजे असे मला वाटले. पेवर ब्लॉकचा व्यवसाय शुरू करण्याचा विचार माझ्या मनात आला.त्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मी बँकेकडून रुपये 10 लाखाचे कर्ज घेतले. अशा रीतीने पेवर ब्लॉक तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून मला नियमित पुरेशे उत्पन्न मिळायला सुरु झाल्याने माझा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत झाली.त्यामुळे मी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मदत झाली, अशा भावना लहवीत येथील संजय निर्मळ यांनी व्यक्त करुन शासनाचे आभार व्यक्त केले.