नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घातक नायलॉन मांजावर बंदी असली तरी त्याचा सर्रास वापर असल्याचे वारंवार समोर येत आहे. आताही हा मांजा पायात अडकल्याने एक ज्येष्ठ नागरिक रक्तबंबाळ झाल्याची घटना गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे घडली आहे. या घटनेत वृद्धाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेतल्याने सदर वृध्द बालंबाल बचावला आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मदनलाल चंपालाल भुतडा (७०, रा. त्र्यंबकेश्वर) असे आहे. भुतडा नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२७) दुपारी त्र्यंबकेश्वरहून एकटेच शहरात आले होते. साडे चार वाजेच्या सुमारास ते रामकुंड परिसरातील गौरी पटांगणावरुन पायी जात असतांना ही घटना घडली. अचानक जमिनीवर पडलेला घातक मांजा त्यांच्या पायात अडकला. पायातून मांजा काढता न आल्याने ते गंभीर जखमी झाले.
ही बाब रस्त्याने दुचाकीवर जाणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय जाधव (रा.इंदिरानगर) यांच्या लक्षात आली. त्यांनी आपले वाहन थांबवून भुतडा यांना गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने जाधव यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. भुतडा यांना १०८ रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पायातून अतिरक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टरांनी भुतडा यांच्यावर तात्काळ उपचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जीवघेण्या व बंदी घालण्यात आलेल्या नॉयलॉन मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतलेले असतांनाही त्याची शहरात राजरोस विक्री होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. पोलिसांची किरकोळ विक्रेत्यांवरील कारवाई कुचकामी ठरत आहे. मुख्य वितरकांचा शोध घेवून संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Nashik Senior Citizen Seriously Injured Nylon Manja
Godaghat Panchavati