नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळी सुट्यांनंतर आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रवेश सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने निर्देश दिले. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, शहरातील भोसला संस्थेच्या शिशु विहार शाळेत वेगळेच चित्र पहायला मिळाले आहे. पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थी गेटबाहेरच बसल्याचे दिसून येत आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांमध्येच विशेष उत्साह आहे. त्यामुळेच शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. असे असतानाच नाशकातील शिशु विहार शाळेमध्ये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवच झाला नाही. प्रत्यक्षात विद्यार्थी व पालक हे शाळेच्या गेटबाहेर आंदोलनाला बसले आहेत. शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील मतभेद आणि वादामुळे हे चित्र निर्माण झाले आहे. शाळेने नवी इमारत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. पण, धोकादायक इमारतीमध्येच नवे शैक्षणिक वर्ष सुरू केले जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
आजपासूनच नव्या इमारतीत वर्ग सुरू करण्याची पालकांची मागणी आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाने त्याची तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे गेल्या अनेक तासांपासून विद्यार्थी शाळेबाहेरच गेटवर बसले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे. यासंदर्भात साळा व्यवस्थापन किंवा भोसला शिक्षण संस्थेकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण आहे.