नाशिक – सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. शाळांसाठी काटेकोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. एका वर्गात जास्तीत जास्त १५ विद्यार्थ्यांना परवानगी असेल. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचार्यांकडून प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर एक आठवडा लक्ष ठेवण्यात येणार आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी हे वर्ग आणि शहरात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.
शाळांचे फोन क्रमांक, त्यांच्या परिसराचे नाव, जवळील आरोग्य केंद्रांचे संपर्क क्रमांक, विद्यर्थ्यांची संख्या ही संपूर्ण माहिती शाळा व्यवस्थापनांनी जमा करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुनील धनगर यांनी केल्या आहेत. आपत्कालीन काळात मदत मिळविण्यासाठी शाळा व्यवस्थापनांनीसुद्धा त्यांचे संपर्क क्रमांक सुरू ठेवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक असून, शाळा व्यवस्थापनांनी ते संबंधितांकडून घ्यावेत. तसेच प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. प्रत्येक वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे १५ विद्यार्थ्यी बसवावेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास अतिरिक्त वर्गात विद्यार्थ्यांना बसवावे, तेही नसल्यास सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात वर्ग घ्यावेत, अशा सूचनाही केल्या आहेत.
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचार्यांनाच विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी हेच विषय शिक्षकांनी प्राधान्याने शिकवावेत. शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे जवळून लक्ष ठेवावे, अशाही सूचना अधिकार्यांनी केल्या आहेत.
नाशिक शहरातील शाळांमध्ये ८ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार एवढी आहे. शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ हात धुण्यासाठी व्यवस्था करावी तसेच शाळांची नियमित स्वच्छता करावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.