नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘हौसला’ या एनजीओ ने त्र्यंबकरोड, महिरावणी येथील डॉ कल्पना चावला मेमोरियल शाळा येथे ‘पेंट अ ड्रीम’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये हौसला स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी पडसाद या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत भिंतीवर सुंदर रंगरंगोटी करून आनंद साजरा केला.
अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा २००३ साली अवकाश मोहिमेदरम्यान झालेल्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आपल्या कर्तृत्वाने भारतीयांची मान जगभरात उंचावणाऱ्या कल्पना चावला यांच्या अंतराळ संशोधन कार्याच्या स्मृती टिकून रहावी म्हणून अंतराळातील गोष्टी जशा कि स्पेस शिप, पृथ्वी, रॉकेट, उपग्रह यांचे चित्र आकर्षक रंगात या शाळेच्या भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. रोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा आपलीशी वाटावी, यासाठी हौसला च्या स्वयंसेवकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत कल्पकतेने शाळा रंगवली. शाळेतील सर्व मुलामुलींनी देखील भिंतीवर हे चित्र काढण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता.
एकूणच रंग आणि प्रेम यांच्याद्वारे आत्मीयता पसरवण्यासाठी एकप्रकारे संवादात्मक आणि मजेदार असा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना शिकण्याची गोडी निर्माण व्हावी, शाळेत येण्याची प्रेरणा मिळावी व त्यांना शिकता यावे या उद्देशाने शाळेच्या बाहेरील भिंतीला आकर्षक रंगरंगोटी करून देण्यात आली.
‘डॉ कल्पना चावला मेमोरियल शाळेच्या हि भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यासाठी हौसला संस्थेच्या गौरी चव्हाण, पूर्वा भावसार, गौरी ठक्कर, मधुरा शहाणे, हीना साखला, नेहा रावळ, रितिका आशिया, निशिका गुप्ता, ऐश्वर्या काल्या, विनिता झुनझुनवाला, कांचन साठे, अपूर्वा काल्या, सायली विभांडिक, प्रणिता शेळके, रश्मी कोहली, गीता पवार, मीना आहेर, कृतिका मारवाह, प्रसाद गर्भे, निखील परदेशी, गणेश सूर्यवंशी, प्रिया पाटील तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील हे या उपक्रमात सहभागी झाले होते.