नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरात पाच ते सहा वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दिलेला गाळा भाडेकरूने बिल्डरकडून परस्पर नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाळा मालकाने याबाबत न्यायालयात धाव घेतली. त्याची दखल न्यायालयाने घेतली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी सात संशयतांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर कॉलनीतील नाना धोंडू कोठावदे यांनी पिंपळगाव बहुला शिवारातील ब्ल्यू डायमंड अपार्टमेंटमधील १२.८० चौरस मीटरचा गाळा कोशी जॉर्ज कुरुविल्ला (५१, रा. कुरुविल्ला बंगला, सारस्वत बँकेजवळ, कॅनडा कॉर्नर) यांच्याकडून २०१५ साली विकत घेतला होता. सदरचा गाळा कोठावदे यांनी राहुल भगवान मुसळे (३५, रा. चामुंडा पार्क, अशोकनगर) यांना पाच- सहा वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दिला होता. दरम्यान, गाळा नावावर करून घेण्यासाठी कोठावदे यांनी बिल्डरकडे तगादा लावला होता. परंतु बिल्डरकडून टाळाटाळ केली जात होती. गाळा मालकाने कागदपत्रांची ‘जुळवाजुळव करीत असताना गाळ्याचा सातबारा उतारा घेतला असता त्यावर भाडेकरी असलेल्या राहुल मुसळे यांनी सदरचा गाळा योगीता राहुल मुसळे (३३, रा. चामुंडा पार्क, अशोकनगर) यांच्या नावावर परस्पर करून घेतल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाना कोठावदे यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार, सातपूर पोलिसांनी भाऊराव केरू पवार (५३, रा. नाशिकरोड), कोशी जॉर्ज कुरुविल्ला (५१, रा. कुरुविल्ला बंगला, सारस्वत बँकेजवळ, कॅनडा कॉर्नर), योगिता राहुल मुसळे, राहुल भगवान मुसळे (३५, रा. चामुंडा पार्क, अशोकनगर, सातपूर), अक्षय दशरथ भोर (४८), सचिन दगूजी निकम (३४, रा. फुलेनगर पेठरोड), देवराम भाऊराव संसारे (६०) आदींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.