सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आषाढीच्या निमित्ताने मांस विक्री न करण्याचा तसेच बकरी ईद असूनही ‘कुर्बाणी’ न देण्याचा कौतुकास्पद निर्णय सातपूर कॉलनी, अशोकनगर व शिवाजीनगर येथील मांस विक्रेत्यांनी घेत एक आदर्श उभा ठाकला आहे. मनसेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या मांस विक्रेत्यांच्या बैठकित हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा एकाच दिवशी २९ जुन गुरुवारी आषाढी व बकरी ईद आल्याने हिंदु-मुस्लीम बांधवानी हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब अशी की, हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीसाठी सज्ज असणार आहेत. या बैठकीला अकील शेख, जाकीर खाटीक, मोहम्मद खाटीक, हारून खाटीक, मुस्तकीम खाटीक, फिरोज मन्सूरी, शकील शेख, अकील शेख, रफिक शेख, जाकीर खाटीक, मजीद मुल्ला, रियाज सय्यद, ईदरीश शेख आदीसह सातपूर कॉलनी, अशोकनगर, शिवाजीनगर परिसरातील मांस विक्रेते उपस्थित होते.
कुर्बानी न देता बकरी ईद
इस्लाम धर्मामध्ये तीन दिवस कुरबानी दिली जाते. त्यामुळे हिंदू धर्मांतील सर्वात मोठ्या आषाढी एकादशीला कुर्बानी न देता इतर दिवशी बकरी ईद साजरा करण्याचा एकमुखी निर्णय मटन विक्रेत्यांनी घेतला आहे.
सलीम शेख, मा. नगरसेवक