सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्याचे पडसाद आता नाशिक जिल्ह्यातही उमटले आहेत. सटाणा येथे बहुजन वंचित आघाडी व आदिवासी संघटनातर्फे अर्धनग्न आंदोलन करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
मणिपूर येथे आदिवासी महिलांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. तसेच, त्यांच्यावर अत्याचारही करण्यात आले. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचे पडसाद सध्या ठिकठिकाणी उमटत आहेत. तसेच, या घटनेचा निषेध करुन दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. सटाणा येथेही अशाच प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान तहसील कार्यल्यावरून परत येत असताना काहींनी रस्ता रोको करत अनेक गाड्यांची तोडफोड केली. स्थानिक आमदार आदिवासी असूनही ते मोर्चात सहभागी झाले नसल्याच्या आरोप करीत आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी रागातून अनेक गाड्यांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पंगवले. विंचूर-प्रकाशा या महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी वाहतूक काही काळ खोळंबली.