सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील मौराणे येथील निंबा शेवाळे यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात समाज कंटकाने युरिया टाकला. त्यामुळे त्यांचे पंचेचाळीस ट्रॉली कांदा खराब झाल्याने त्यांचे सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले. चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी कांदा साठवून ठेवला होता. पण, युरीया टाकल्यामुळे शेवाळे यांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडले.
काबाडकष्ट करून पिकवलेल्या व पोटाचा मुलांप्रमाणे सांबळलेला कांद्याचे काही क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी अज्ञात समाज कंटकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अज्ञात समाज कंटकाचा शोध घेत आहे.
वर्षभरापूर्वी मालेगाव तालुक्यातील लोणवाडे शिवारातील एका शेतकऱ्याने सर्व आव्हानांना तोंड देत कष्टाने कांदा पिकवला. पण बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने तो चाळीत साठवून ठेवला. या कांद्यावर अज्ञाताने युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांद्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे तुषार भुसे (सोयगाव, मालेगाव) या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हे नुकसान झाले होते.
शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतो. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि समाजातील असामाजिक तत्वांमुळे शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे नुकसान होते. अशा तत्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.