नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. बस थेट ३०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात १ महिला प्रवासी ठार झाली असून २१ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस आहे. त्यात २२ प्रवासी प्रवास करीत होते. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून पालकमंत्री श्री. भुसे हे स्वतः आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तहसीलदार कळवण, पोलीस प्रशासन, ट्रस्ट व्यवस्थापक व पदाधिकारी, सप्तशृंगगड व नांदुरी स्थानिक ग्रामस्थ मदतकार्यात पोहचले आहेत.
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मुक्कामी असलेली खामगाव आगराची बस घाट उतरून येत होती. त्याचवेळी गणपती पॉईंट जवळ चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस ३०० फूट खाली गेली. या अपघातात एक प्रवासी महिला ठार झाली आहे. तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गडावरील नागरिक घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना वर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने वणी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजतात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींची भेट घेतली आहे.
मृत महिला अमळनेरची
मृत महिलेचे नाव अशाबाई राजेंद्र पाटील (वय ५० ते ५५, रा. मुडी, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे आहे.
मुडी गावचे सर्वाधिक प्रवासी
बसमध्ये एकूण २३ जण होते. त्यात वाहक आणि चालकाचा समावेश आहे. म्हणजेच २१ प्रवासी होते. यातील सर्वाधिक प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे आहेत. मुडी गावचे एकूण १६ प्रवासी बसमध्ये होते. त्याचतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य १५ जण जखमी आहेत.
असा झाला अपघात
मुक्कामी असलेली ही बस पहाटे ६ वाजता सप्तशृंग गडावरुन निघाली. त्यानंतर ही बस घाटात आली. बसमध्ये एकूण २१ प्रवासी होते. कंडक्टरने तिकीट काढण्याचे काम संपवले. त्यानंतर तो एकूण प्रवासी मोजत होता. बसचा वेग कमीच होता. तेवढ्यात दाट धुक्यामुळे वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. असे असले तरी चालकाने शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाटातून थेट बस कोसळली. सुदैवाने वेग जास्त नसल्याने या अपघातात मोठी जिवीतहानी झालेली नाही.