नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहिले “सह्याद्री मित्र संमेलन” नाशिकमध्ये होणार असल्याचे जाहीर झाले आहे. नाशिकमधील नामवंत गिरीभ्रमणकार अर्थात ट्रेकर कै.अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ..
शुक्रवार दिनांक ७ जुलै २०२३ रोजी दुपारी ४ वाजता, महाकवी कालिदास कलामंदिरात ” सह्याद्री मित्र संमेलन ” आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला राज्यभरातील ट्रेकर्स येणार आहेत.
संमेलन आयोजन समितीने सांगितले आहे की, जोशी काका यांनी गेल्या ४० ते ४५ वर्षांत गिरीभ्रमण क्षेत्रात केलेल्या अमुल्य कार्याचा गौरव म्हणून हे संमेलन आयोजित केले जात आहे. (ते दर वर्षी घेतले जाणार आहे.) हे संमेलनाचं पहिलंच वर्ष असल्याने कार्यक्रमाची रूपरेषा ही आटोपशीर ठेवण्याचा प्रयत्न आहे. जरी हे संमेलन अर्ध्या दिवसासाठी असलं तरी ते अधिक दिमाखदार व चिरस्मरणीय व्हावं यासाठी नाशिकमधील सर्व ट्रेकर मंडळी, संस्था व आयोजन समिती प्रयत्नशील आहे.
या संमेलनात भारतातील नामवंत गिर्यारोहक,लेखक ‘ट्रेक व सह्याद्री ‘या पुस्तकाचे जनक.. श्री.हरिषजी कापडिया यांना ” सह्याद्री रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्याच बरोबर कापडिया सरांचा “सह्याद्री ते हिमालय” हा ५० हून अधिक वर्षांचा प्रवास ते आपल्या दिड तासाच्या audio visual presentation द्वारे उलगडून दाखवणार आहेत.कापडीया सर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये प्रथमचं येत आहेत.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या कारणानें नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक,लेखक श्री.आनंद पाळंदे (पुणे) उपस्थित रहाणार आहेत.ट्रेकिंगसाठी आवश्यक माहिती असणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.ती पुस्तके वाचूनचं ट्रेकर्सच्या २/३ पिढ्या तरी घडल्या असणार हे निश्चित. जेंव्हा सोशल मिडिया किंवा माहितीचं मायाजाल इंटरनेट उपलब्ध नव्हते तेंव्हा पाळंदे काकांची पुस्तके वाचून एक ट्रेकर जमातीची सुशिक्षित पिढी घडली.असं म्हणणं वावगे ठरणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महसूल आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे उपलब्ध असणार आहेत.ते स्वतः निसर्गप्रेमी असून उत्कृष्ट ट्रेकरही आहेत. या कार्यक्रमात इतरही काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार नाशिकचे नामवंत ट्रेकर व सायकलिस्ट डॉ श्री.हितेंद्र व महेंद्र महाजन बंधूंना देण्यात येणार आहे.तसेचं सह्याद्रीच्या कुशीत घडणाऱ्या अपघात वेळी जीवावर उदार होऊन मदतीसाठी धावून जाणारी एकमेव संस्था नाशिक क्लाईंबर्स व रेस्क्यू संस्थेला ही हा ” विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
रेस्क्यू टीम आॕफ द इयर, दुर्गसंवर्धन टीम आॕफ द इयर ट्रेकर आॕफ द इयर, वाटाड्या आॕफ द इयर तसेच फोटोग्राफी व ब्लॉगर्स स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिकमधील युवकांची क्लाईबिंकची एक साहसी फिल्म ही दाखविण्यात येणार आहे.यानिमित्त नाशिककरांच्या साहसाला दाद देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अश्या विविध पुरस्काराने व कार्यक्रमांनी नाशिक शहरातील हे पहिले सह्याद्री मित्र संमेलन ऐतिहासिक घटनेची साक्ष ठरणार आहे.याबद्दल तिळमात्र शंका नाही, असे समितीने म्हटले आहे.