नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विदर्भाचा कृषी विकासाचा दर २२ टक्क्यांपर्यंत न्यायचा असेल तर पीक पद्धतीचा ‘फोकस’ बदलावा लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित डॉ. सी.डी मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.*
कृषी उत्पादनाच्या बाजारपेठेसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापक संचालक विलास शिंदे यांना २०२३ चा डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख एक लक्ष रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य विजय जावंधिया होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. मायी, डॉ. गिरीश गांधी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘जोपर्यंत विदर्भामध्ये एका एकरात वीस क्विंटल कापूस होत नाही, एक एकरात कमीत कमी १५ क्विंटल सोयाबीन होत नाही, आणि तीस टन संत्रा होत नाही, तोपर्यंत पुढील गोष्टींचा विचारच करता येणार नाही. आधी उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढवावा लागेल. मागणी आणि पुरवठ्याचा विचार करावा लागेल. त्यानंतरच बाकीच्या गोष्टींमध्ये आपण पुढे जाऊ शकतो.’ शेतकऱ्यांनी अभ्यास करून पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. जगात कशाची मागणी जास्त आहे, याचा विचार करून पीक घ्या. कारण आता शेतमालाचे भाव भारताला निश्चित करता येत नाहीत. जागतिक अर्थव्यवस्थेवर शेतमालाचे भाव अवलंबून आहेत. त्यामुळे अभ्यास करूनच शेती करणे अनिवार्य झाले आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शेतीचा ‘फोकस’ बदलला म्हणजे काय होऊ शकते, हे विलास शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. असे दोन-चार विलास शिंदे विदर्भात तयार झाले तर चित्र पालटलेले असेल, या शब्दांत ना. श्री. गडकरी यांनी सत्कारमूर्तींचा गौरव केला.
‘थिंक टँक’ची आवश्यकता
विदर्भाचा कृषी विकास दर वाढविण्यासाठी संत्र्याचा, कापसाचा, बांबूचा अभ्यास असलेली ‘थिंक टँक’ आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार कोणते व्हिजन ठेवून आणि कोणते तंत्रज्ञान वापरून दुधापासून सोयाबीनपर्यंत काम केले पाहिजे, हे ठरविणे शक्य होईल, असेही मत ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.