नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्माचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दि. १५ जुलै रोजी नागपूर येथे वसंतराव नाईक सभागृह (वनामती) येथे सायंकाळी सहा वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ कृषी अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीधर (एम. टेक्.) असलेले विलास शिंदे सुमारे २८ वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली देशातील आघाडीची व सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा लौकिक आहे. २०१० मध्ये श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने ही कंपनी सुरू करण्यात आली. १६० शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २० हजारांहून अधिक शेतकरी सभासद आणि सुमारे ३५ हजार एकर क्षेत्रावर पोहोचला आहे. २५२ हून अधिक गावांमध्ये सह्याद्री फार्म्सचे कार्यक्षेत्र आहे.
डॉ. सी. डी. मायी यांच्याबद्दल
डॉ. सी. डी. मायी हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. देशातील नामवंत कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. देशाच्या कापूस संशोधन क्षेत्रात त्यांनी फार मोठी भूमिका बजावली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या काळात विक्रमी संख्येने शास्त्रज्ञांची भरती झाली. डॉ. मायी दिल्लीत कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे (ASRB) चेअरमन होते. कृषी क्षेत्रासाठीच्या नवनव्या तंत्रज्ञानाचे डॉ. मायी कट्टर पुरस्कर्ते आहेत. देशामध्ये नवीन टेक्नॉलॉजी किती आवश्यक आहे, यावर त्यांचा कारकिर्दीच्या सुरुवातीपासून फोकस होता.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दहा वर्षांच्या मंत्रिपदाच्या यशस्वी काळात डॉ. मायी हे पवार यांच्यासोबत होते. निवृत्तीनंतर आजही देशातील तसेच परदेशातील नामवंत संस्थांवर तसेच सरकारच्या समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानने त्यांच्या नावाचा हा पुरस्कार सुरू केला आहे.