नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांसाठी एम्पलॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) योजना लागू करण्यात आली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना रू. 70 कोटीचे समभाग (शेअर्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रू. 70 कोटी रुपयांच्या कंपनीच्या एकूण देयकाच्या चार टक्के समभाग या योजनेला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. अल्पभूधारक व छोट्या शेतकऱ्यांच्या मालकीची एकात्मिक मुल्यसाखळी म्हणून ‘सह्याद्री फार्म्स‘ला ओळखले जाते.
“सह्याद्री फार्म्स ही ग्रामीण भारतात इसॉप योजनेची घोषणा करणारी पहिली संस्था आहे. या योजनेत ‘सह्याद्री फार्म्स‘च्या वाढीसाठी मूल्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.सर्व भागधारकांसाठी सर्वसमावेशक वाढ आणि मूल्यनिर्मिती हे ‘सह्याद्री फार्म्स‘ ची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. ही संस्था आपल्या सर्व भागधारकांसाठी, प्रामुख्याने शेतकरी भागधारकांसह ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासाठी मूल्य निर्माण करत आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रमाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री फार्म्सने कर्मचाऱ्यांच्या हितालाही तितकेच प्राधान्य दिले आहे. ही योजना त्याचाच एक भाग आहे. ‘सह्याद्री फार्म्स’च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.” असे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले.
इसॉप योजनेत समाविष्ट कर्मचार्यांची एकूण संख्या 461 आहे तर तिचा निहित कालावधी चार वर्षांचा आहे. यात कंपनीतील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता ही एक अनोखी योजना आहे ज्यामध्ये पदानुक्रमाचे निकष न ठेवता सर्वांना लाभ मिळेल. या योजनेसाठी इतर अनेक कंपन्या प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवरच लक्ष केंद्रित करत असताना सह्याद्री फार्म्सने मात्र आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. यामुळे कंपनी आणि कर्मचाऱ्यांतील बंध अधिक मजबूत होतील. कामाची उत्पादकता वाढण्याबरोबरच थेट आर्थिक पाठबळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.
गेली अनेक वर्षे मी सह्याद्री फार्म्समध्ये काम करीत आहे. अगदी सुरवातीपासून या संस्थेच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. संस्था आता प्रगतीच्या टप्प्यावर असताना व्यवस्थापनाने आमच्याही संपत्ती निर्माणाचा विचार करून आम्हाला समभाग देण्याचा एतिहासीक निर्णय घेतला.यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मात्र त्याचवेळी आम्हा अधिक जबाबदारीने, आपलेपणाने कष्ट करण्यास आम्हाला अधिक बळ येणार आहे.
– जनार्दन उन्हवणे, कर्मचारी सह्याद्री फार्म्स
Nashik Sahyadri Agro Farm Employee 70 Crore Shares
Farmer Producer Company