नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ऐतिहासिक सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके यांची निवड झाली आहे. सावानाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काल मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलचे प्रा. फडके यांनी विजय प्राप्त केला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी ग्रंथालय मित्र पॅनलचे वसंतराव खैरनार यांचा पराभव केला आहे. प्रा. फडके यांना १५७५ तर खैरनार यांना १४५० मते मिळाली. अन्य पदांसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. कुठल्या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रा. फडके हे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रातील संस्थांमध्ये ते सक्रीय असतात. त्यांनी विविध पदेही भूषविली आहेत. ते प्रथितयश लेखकही आहेत. इंडिया दर्पण लाईव्हमध्ये त्यांनी दर मंगळवारी वलयांकित हे सदर लेखनही केले. ते अतिशय लोकप्रिय ठरले. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.