नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहमीच टक्केवारीचे गणित जुळविण्याला प्राधान्य देणाऱ्या जिल्हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची दाढी कुरवळण्याची वेळ बदलीपात्र शिक्षकांवर आली आहे. त्यासाठी निमित्त ठरले अंतराचा दाखला ! अभियंता जागेवर भेटत नसल्याने संबंधित शिक्षकांना दिवसभर त्याच्या दालनाबाहेर तिष्ठत राहावे लागल्याचेही चित्र मंगळवारी मिनी मंत्रालयाच्या आवारात पाहायला मिळाले.
कोणतीही फाईल टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय मार्गी लावतील ते अभियंते कसले! हात ओले झाल्याशिवाय कामच न करण्याची जणू सवय जडलेल्या अभियंत्यांविरोधात आमदारांनी टाहो फोडला किंवा पालकमंत्रांनी चौकशीचे आदेश दिले काय त्यांना काडीचाही फरक पडत नाही, हे जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून अनुभवायलाही मिळत आहे. त्याचेच प्रत्यंतर मंगळवारी पुन्हा आले.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. त्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळही केली जात आहे. ज्यांना पती-पत्नी एकत्रीकरणानुसार बदली हवी आहे, अशा शिक्षकांना अंतराचा दाखला सादर करणे क्रमप्राप्त आहे. २०२१ च्या शासन आदेशात ही अट समाविष्ठ आहे. पती आणि पत्नी या दोघांच्याही शाळेचे अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असेल, अशा शिक्षकांना बदली हवी असेल तर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून अंतराचा दाखला मिळवावा लागणार आहे.
अशा शिक्षकांची मंगळवारी जिल्हा परिषदेत गर्दी दिसून आली. बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे ते काही भेटलेच नाहीत. त्यांचा अतिरिक्त कारभार ज्यांच्याकडे आहे ते बांधकाम दोन चे कार्यकारी अभियंता नारखेडे हेही संबंधित शिक्षकांना भेट देण्यास असमर्थ ठरले. बांधकाम विभाग तीनच्या अभियंत्यांच्या बाबतीतही हाच अनुभव शिक्षकांना आला.
एकही अभियंता जागेवर नसल्याने शिक्षकांना तिष्ठत राहावे लागले. खरे तर या शिक्षकांना दाखला देऊन त्यांच्याकडून संबंधित अभियंत्याचे हात ओले होण्याची शक्यता कमीच. बहुधा याच कारणामुळे शिक्षकांना दाखला मिळविण्यासाठी दिव्य पार करावे लागत असल्याचे बोलले जाते. जोपर्यंत हा दाखला अपलोड केला जात नाही तोपर्यंत संबंधित शिक्षकांच्या प्रस्तावाला अर्थ प्राप्त होत नाही. आता हा दाखला नेमका कधी मिळणार अन शिक्षकांना अजून किती दिवस अभियंत्याच्या दालनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.
Nashik Rural ZP School Teacher Today Experience