दिंडोरी- शेतकऱ्यांनी द्राक्षासह सर्व शेतमालाचे व्यवहार करतांना काळजी घ्यावी व व्यापाऱ्यांचा नाव, पत्ता ,आदी माहिती मिळवत खात्री करुन शक्यतो रोखीनेच आपला शेतीमाल विक्री करावा. आगाऊ धनादेश देत माल खरेदी करत पुढे पैसे न देण्याचा फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहोत. शेतकऱ्यांची फसवणूक करत आर्थिक लाभ करून घेणाऱ्या व्यापाऱ्यांसोबतच त्याचे नातेवाईकांवरही वेळ प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे.
धनादेश न वटल्यास संबंधितांवर कठोर कारवाई बाबत कायद्यात सुधारणा होण्याची गरज असून शेतकऱ्यांच्या फसवणूक टाळण्यासाठी कठोर कायदा होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादकांची द्राक्ष व्यापाऱ्यांकडून धनादेश देत द्राक्ष खरेदी करत पुढे पैसे न देत फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. माजी पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करत शेतकऱ्यांना पैसे परत मिळवून देण्याची मोहीम पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढे सुरू ठेवली आहे.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी पाटील यांनी कादवा सहकारी साखर कारखान्यावर हितगुज केले. त्यांचे तक्रार अर्ज घेत कारवाई करत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यावेळी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी काही उपाययोजना सुचवून पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अनेक व्यापाऱ्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार समोर येत आहेत. २०२०-२१ या वर्षात कोट्यावधींची फसवणुक करुन व्यापारी फरार झाले आहे. खोटे धनादेश देवुन तर काही शेतकऱ्यांशी तोंडी व्यवहार करुन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. यामुळे शेतकरी उध्दवस्त झाला असुन घरातील लग्न समारंभ,उसणवारी,औषधे,खते, कर्ज हे सर्व व्यवहार ठप्प होत आहे. तसेच पुढील पिक उभे करतांना शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी तक्रार अर्ज दिले.
यावेळी नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील,कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत,सहायक पोलिस निरीक्षक अनंत तारगे कादवा चे संचालक मधुकर गटकळ,साहेबराव पाटील,बापू पडोळ,सुखदेव जाधव,रामदास पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.प्रास्ताविक रघुनाथ पाटील यांनी करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.