नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिनाभरात नाशिक ग्रामीण पोलिसांनी १ कोटी ३६ लाख रूपये किमतीचा गुटखा जप्त करुन १०९ गुन्हे दाखल करुन विक्री करणा-या ११५ जणांना गजाआड केले आहे. ६ ते ३० जून दरम्यान विशेष मोहिम राबवून ही कारवाई बारा विशेष पथकांनी केली आहे.
गाव पातळी पासून तालूकानिहाय थेट पान टप-यांसह गोडावून व अन्य ठिकाणीही छापा सत्र सुरू झाल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. याबरोबरच राष्ट्रीय तस्करांच्या मुसक्या आवळत गुटख्याची राज्यातील वितरण व्यवस्था विस्कळीत केली आहे.
पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत गेल्या महिनाभरात गुटख्याची वाहतूक,विक्री,वितरण व साठवणुक करणा-यांविरूध्द भादवी कलम ३२८,१८८,२७२,२७३ सह कलम ३० (२) अ अन्न व सुरक्षा आणि मानके कायदा २०६ प्रमाणे १०९ गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत ११५ जणांच्या मुसक्या आवळत तब्बल १ कोटी ३६ लाख ६ हजार ७८५ रूपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.