नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेली मोठी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे.
पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, एक मोठी टोळी दरोड्याच्या तयारीत होती. यासंदर्भात वणी पोलिसांना काही माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. त्यात ही टोळी सापडली आहे. या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ७९ हजार ८६० रूपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून पेपर स्प्रे, नायलॉन दोरी, लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. सोनेरी रंगाची बिस्किटे आणि १३ मोबाईल असा ३ लाख १८ हजार रुपयांचा ऐवजही पोलिसांनी या टोळीकडून जप्त केला आहे. गुजरातमधून या संशयितानी दरोडा घातल्याचे समजते आहे.
वणी पोलिसांच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. सोन्याची बिस्किटे विक्री करण्याच्या बहाण्याने अनेकांना या टोळीने लुटले आहे. जयप्रकाश मेहेर, रमेश पवार, वसंत पवार, संपत मुढा, लक्ष्मण कोल्हे, कमलाकर गांगुर्डे, शिवदत्त विश्वकर्मा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य संशयित हा जयप्रकाश मेहेर आहे. त्याच्याविरोधात परराज्यात गुन्हे दाखल असल्याची बाब ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. या टोळीची कसून चौकशी केली जात असून त्यात अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.