नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनास धडक देवून पसार झालेल्या क्रेटा कार चालकास ग्रामिण पोलीसांनी अखेर बेड्या ठोकल्या. गेल्या दोन महिन्यांपासून गुंगारा देणा-या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने केद्रशासित दमण येथे जेरबंद केले आहे. या अपघातात एक्साईज विभागाच्या एका कर्मचा-याचा हकनाक बळी गेला आहे.
संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी (३३, रा. रिंगनवाडा, दमण. मूळ रा. नौसारा, जि. जालोड, राजस्थान) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या ७ जुलै रोजी मध्यरात्री लासलगाव चांदवड मार्गावर ही घटना घडली होती. मद्यतस्करांचा पाठलाग करीत असतांना एक्साईज विभागाच्या वाहनास धडक देण्यात आल्याने कैलास कसबे या कर्मचा-याचा मृत्यू झाला तर लासलगाव पोलीसासह एक्साईज विभागाचे एक कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मद्यतस्करांविरोधात गुन्हा दाखल करत पोलीसांनी या गुह्यात देवीश पटेल, अश्पाक अली शेख, राहुल सहाणी, शोहेब अन्सारी, भावेशकुमार प्रजापती या पाच संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र एक्साईजच्या वाहनास धडक देणारा क्रेटा कारचालक संशयित मारवाडी घटनेपासून पसार होता. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामिण पोलीस त्याच्या मागावर होते.
केंद्रशासित दमन, दादर-नगर हवेली या ठिकाणी तळ ठोकत पथकाने मारवाडी याच्या दमन येथे मुसक्या आवळल्या असून त्यास चांदवड पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, हवालदार सचिन देसले, किशोर कराटे, धनंजय शिलावटे, प्रकाश कासार, मेघराज जाधव, नितीन डावखर, मनोज सानप, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले आदींच्या पथकाने केली.