नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असतानाच आता जिल्ह्यात इतर साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. ग्रामीण भागात चिकनगुनियाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. ग्रामीण भागात यावर्षी ८३ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी रुग्णांचा हाच आकडा केवळ ४३ होता. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदीर घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पेठ तालुक्यातील कुळवंडी आणि दिंडोरी तालुक्यातील निगडोल गावातील काही ग्रामस्थांना ताप आणि सांधेदुखीचा त्रास जाणवत होता. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सर्वेक्षण केल्यानंतर चिकनगुनियाचे २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी पाणी साठविण्याचे भांडे, हौद आदी स्वच्छ करून ड्राय डे पाळावा. राहण्याच्या ठिकाणाजवळ स्वच्छता ठेवावी जेणेकरून मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यासारख्या आजारांना आळा बसेल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा मलेरिया अधिकारी मधुकर अहिरे सांगतात, पावसाने ओढ दिल्याने ग्रामस्थ भांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणी साठवत आहेत. आवश्यक आणि योग्य ती काळजी घेतली गेली नाही, तर एडीस डासांमुळे चिकुनगुनिया, डेंगीसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
घरांमध्ये डासांचे निर्मुलन करण्यासाठी घरातील पाण्याच्या भांड्याना आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच पाणवठे, हौद, ड्रम. इत्यादींची स्वच्छता ठेवावी. तसेच घराच्या आजूबाजूला, टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य कर्मचार्यांकडून घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. ताप, सांधेदुखीसारखे लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन करण्यात येत आहे.