नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड काळात विधवा झालेल्या गरजू महिलांना आधार देतांनाच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने मदतीचा हात दिला आहे. शहरातील अशा सहा गरजू महिलांना रोटरीच्या मायक्रोक्रेडिट रोजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची मदत केली आहे.
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे विविध वंचित गटांना त्यांच्या उद्योज व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून मदतीचा हात देत आहे. याद्वारे गरजू महिलांना मदत व्हावी म्हणून विनाव्याज पतपुरवठा केला जातो. ही योजना २०११ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. आजवर १२ महिला बचत गटातील १२० महिला, सामाजिक संस्था क्षेत्रातील ५० महिला, वैयक्तिक पातळीवर व्यवसाय सुरू करणाऱ्या १५ अशा तब्बल १८५ महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी करण्यात आले असून, सुमारे २० लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय अलीकडेच कोविड महामारी दरम्यान विधवा झालेल्या अशाच सहा महिलांना रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे १ लाख २५ हजारांचा पतपुरवठा अध्यक्ष प्रफुल बरडिया यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी फाऊंडेशनचे डिस्ट्रिक्ट चेअरमन रवी महादेवकर आणि कोरोना एकल महिला पुनर्वसन संस्थेच्या दीपा खेडकर यांची याकामी मोलाची मदत झाली. कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत आणि सचिव ओमप्रकाश रावत याप्रसंगी उपस्थित होते. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी रोटरीने मदतीचा हात दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रफुल बरडिया म्हणाले, रोटरीतर्फे महिला सशक्तीकरणासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. गरजू आणि वंचित महिलांसाठी रोटरी संस्था नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सचिव ओमप्रकाश रावत हेदेखील यावेळी उपस्थित होते.
Nashik Rotary Club Initiative Covid Widow Help