नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरालगत रोपवे प्रकल्प साकारला जाणार आहे. रोपवे प्रकल्पासाठी नाशिक शहरासह महाराष्ट्रातील एकूण ४ शहरांची निवड केंद्र सरकारने केली आहे. नाशिक शहरालगत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना जोडणारा हा रोपवे असणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारला विश्वास आहे.
ही आहेत ४ ठिकाणे
नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ही केंद्र सरकारची कंपनी महाराष्ट्रात एकूण ४ ठिकाणी रोपवे प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी ही कंपनी १ हजार कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च करणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात ४ ठिकाणे निवडली आहेत. त्यामध्ये नाशिक शहराजवळील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी (५.८ किलोमीटर), पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला (१.४ किलोमीटर), रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला, महाड (१.४ किलोमीटर) आणि माथेरान हिल स्टेशन (५ किलोमीटर) यांचा समावेश आहे.
अर्थमंत्र्यांची घोषणा
केंद्र सरकारने पर्वतमाला ही योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत हे प्रकल्प होणार आहेत. NHLML ही कंपनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत कार्य करते. २०२२-२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम – “पर्वतमाला” या प्रकल्पाची घोषणा केली होती. कठीण डोंगराळ भागात पारंपारिक रस्त्यांच्या जागी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा स्वरुपाचे रोपवे उभारण्याचे त्यात नमूद आहे.
अंजनेरीला सर्वात पहिले
NHLML चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात चार रोपवे प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मोठ्या गतीने काम करत आहोत. या चार प्रकल्पांपैकी ब्रम्हगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यानचा पहिला प्रकल्प राबविण्यात येणार आहे. उरलेल्या तीन प्रकल्पांवर काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण केले जातील.
असा असेल रोपवे
ब्रम्हगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यान या रोपवे प्रकल्पाचे अंतिम संरेखन राज्य सरकारशी सल्लामसलत करून निश्चित करण्यात आले आहे. सध्या एक अभियांत्रिकी अभ्यास सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस निविदा काढल्या जातील. हा प्रकल्प हायब्रीड अॅन्युइटी मोड (HAM) वर राबविण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे रोपवे प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला (MDG) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी ३० हून अधिक टॉवर बांधले जाणार आहेत. रोपवेची वाहून नेण्याची क्षमता प्रति तास किमान १५०० प्रवासी असण्याची शक्यता आहे.
पर्यटनाला चालना
ब्रम्हगिरी पर्वत आणि अंजनेरी या दोन्ही डोंगरांना धार्मिक महत्त्व आहे. ब्रम्हगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे आणि तिच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आहे. तसेच अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येतात. पण डोंगरमाथ्यावर जाणे अत्यंत त्रासदायक आहे. रोपवेमुळे दोन्ही डोंगरमाथ्यावर पर्यटकांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.
येथे सुरू आहेत प्रकल्प
NHLML ने काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश), मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश), केदारनाथ (उत्तराखंड), उज्जैन महाकाल (मध्य प्रदेश) आणि ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) यांसारख्या देशातील इतर ज्योतिर्लिंगांमध्ये असेच प्रकल्प हाती घेतले आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, या रोपवे प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळेल. ब्रम्हगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडीचा समावेश असलेला प्रकल्प वृद्ध पर्यटकांसाठी वरदान ठरेल. ज्यांना डोंगरमाथ्यावर चढणे कठीण आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल, असे गोडसे यांनी सांगितले आहे.
Nashik Ropeway Project Maharashtra Tourism Development