नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञातस्थळी घेऊन जात दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केला आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे दोन वाजल्याने ही महिला रेल्वे स्थानकावरील फ्लॅट फार्म नं २ वर एका बाकावर बसली होती. यावेळी तिने बहिणीला एका महिलेच्या फोन वरून फोन केला. बहिणीने तिला सकाळी घ्यायला येते असे सांगितले. त्यामुळे पीडित महिला बाकावरच झोपली. ही महिला मुळ गुजरात राज्यात राहणारी विवाहिता आहे. ही महिला पतीपासून विभक्त झाल्याने माहेरी राहायला आली होती. आईसोबत भांडण झाल्याने ती नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे येत होती. ती गुजरात राज्यातून मुंबई आणि मुंबईहून नाशिकला आली.
गुंगीचे औषध दिले
बाकावर झोपलेल्या महिलेला बघून मध्यरात्रीच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आली. कुठे जायचे असे त्याने विचारले. तसेच मी सोडून देतो असे सांगत बळजबरीने तिला वडापाव खायला दिला. एका रिक्षात तिला बसविले. स्थानकाबाहेरील एका मेडिकल दुकानात जाऊन काहीतरी औषध आणले. ते तिला बळजबरीने पाजले. ते औषध पिल्यानंतर महिलेला गुंगी आली. संशयित आणि त्याचा साथीदार यांनी या महिलेला चेहेडी येथे पेरूच्या बागेत नेले. तेथे आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला आणि तेथून त्यांनी पळ काढला.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास पीडित महिलेने शेजारी असलेल्या एका इमारतीमधील वॉचमनला सदर घटनाक्रम सांगितला. त्यानंतर ती नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली आणि तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.