नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर लवकरच स्लिपिंग पॉडसची सुविधा उपलब्ध होणार आहे. तशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना लॉज बुक करण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दानवे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दानवे म्हणाले की, भारतीय रेल्वेने आपल्या थकलेल्या प्रवाशांसाठी जबरदस्त सुविधा आणली आहे. याचा फायदा घेतल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सातत्याने काम करत आहे. पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची सोय लक्षात घेऊन ही सेवा खास सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर हॉटेलच्या शोधात भटकावे लागणार नाही. तसेच, ही सेवा अशा प्रवाशांसाठी खूप उपयुक्त आहे जे एका शहरातून दुसऱ्या शहरात खूप प्रवास करतात आणि त्यांच्या व्यवसाय बैठकीसाठी हॉटेलमध्ये मुक्काम करतात, असे दानवे यांनी सांगितले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर स्लीपिंग पॉड्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पॉड हॉटेल उघडण्यात आले होते. प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर मुक्कामाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम सुरू केला आहे. स्लीपिंग पॉड्स म्हणजे प्रवाशांना राहण्यासाठी लहान खोल्या आहेत. त्यांना कॅप्सूल हॉटेल्स असेही म्हणतात.
या सुविधा मिळतात
रेल्वे स्थानकावर असलेल्या वेटिंग रूमच्या तुलनेत स्लीपिंग पॉडसचे भाडे कमी आहे. मात्र येथे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा मिळणार आहेत. यामध्ये एअर कंडिशनर रूममध्ये राहण्याच्या सुविधेसोबतच फोन चार्जिंग, लॉकर रूम, इंटरकॉम, डिलक्स बाथरूम आणि टॉयलेट अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या मुख्य मार्गावरील प्रतीक्षालयाजवळ रेल्वेने नवीन स्लीपिंग पॉड हॉटेल सुरू केले आहे. त्याचे नाव नमः स्लीपिंग पॉड्स आहे. सीएसएमटी येथे सध्या असलेल्या या स्लीपिंग पॉड्समध्ये सध्या ४० स्लीपिंग पॉड्स असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. यामध्ये ३० सिंगल पॉडस, ६ दुहेरी पॉडस आणि ४ फॅमिली पॉडस आहेत. सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बनवलेले नमः स्लीपिंग पॉड्स ऑनलाइन बुकिंगसाठी किंवा काउंटरवर जाऊन बुक करू शकता.