नाशिक – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन कौटुंबिक कारणातून विवाहितेचा छळ केला असल्याची तक्रार मृत विवाहितेच्या आईने पोलिस स्थानकात दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, वारंवार टोमणे मारणे, वाईट शिवीगाळ करून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रासाबरोबरच क्रूरतेने वागणूक दिल्यामुळे या छळाला कंटाळून माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या मुलीला मणक्याच्या त्रास होता, तिला कोणत्याही दवाखान्यात न नेता तू काही एक कामाची नाही, असे तिला सांगून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत १ ऑगस्ट २०१५ ते २८ एप्रिल २०२२ या दरम्यान ती सासरी नांदत होती. यावेळी तिला पती, सासरे, दीर व नणंद यांनी संगनमत करून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच कौटुंबिक कारणावरून वाद घातला. ती घरातील काहीही काम करीत नाही, विवाहितेची सासू कोरोना आजाराने मयत झाली असल्याचे माहीत असताना देखील सासूला तूच काही तरी चारल्याने तिचा मृत्यू झाला, असे म्हणून त्रास दिला. या तक्रारीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे करीत आहेत.