नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पदोन्नती आणि रिक्त पदांची भरती करण्याच्या मागणीकडे राज्य सरकारकडून चालढकल सुरु असल्याच्या निषेधार्थ महसूल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाने येत्या ४ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा शासनाला दिला आहे. त्यासाठी महसूल बहुजन कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथील धन्य वितरण अधिकारी कार्यालय येथे महासंघातर्फे निदर्शने देखील करण्यात आली. महसूल खात्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून पुरेशा मनुष्यबळाअभावी आहे त्या कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. अनुकंपा तत्वावरील प्रस्ताव देखील धूळ खात पडून आहेत. पदोन्नतीच्या मागणीकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी महसूल बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाने संपाचे अस्त्र उगारले आहे. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष नितिन गायकवाड, मनोज चांगले, संतोष दुसाने, भगवान मोकाशी आदी कर्मचारी उपस्थित होते.