नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुकानात शिरून त्रिकुटाने तरूणास बेदम मारहाण करीत गल्यातील रोकड लांबविल्याची घटना सिन्नर फाटा भागात घडली. या घटनेत तरूणावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन शेख,नरेश नरोटे व सोहेल शेख अशी लुटमार करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शेख मेहबुब अब्दूल (रा.श्रीकृष्णनगर,अरिंगळे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचा मुलगा समिर शेख (२०) हा या घटनेत जखमी झाला असून मंगळवारी (दि.१२) रात्री ही घटना घडली.
शेख यांचे सिन्नर फाटा येथील रायबा हॉटेल परिसरात न्यु फॅशन नावाचे कापड दुकान आहे. समिर शेख हा तरूण मंगळवारी रात्री आपला व्यवसाय सांभाळत असतांना त्रिकुटाने त्यास गाठले. दुकानात शिरत संशयितांनी समिरकडे पैश्यांची मागणी केली. परंतू समिर याने पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त झालेल्या त्रिकुटाने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रसंगी अमन शेख या संशयिताने त्याच्या हातावर व डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केले तर नरोटे याने फरशीचा तुकडा मारल्याने समिर शेख हा जखमी झाला असून तो जमिनीवर कोसळताच संशयित त्रिकुटाने दुकानाच्या गल्यातील पाच हजारांच्या रोकड काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.