नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावसह मालधक्का विहीतगाव आणि परिसरात दहशत माजविणा-यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तसेच त्याची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यान्वये ही कारवाई पोलिसांनी केली आहे. प्रशांत उर्फ डुमा अशोक बागुल (२६ रा.बागुलनगर,विहीतगाव ना.रोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
डुमा बागुल याची देवळालीगाव, सोमवार बाजार, मालधक्का, विहीतगाव आणि परिसरात मोठी दहशत आहे. खून, खूनाचा प्रयत्न, गृहअतिक्रमण, घातक शस्त्रास्त्रे बाळगणे, दरोडा आदींसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दहशत कायम ठेवण्यासाठी तो धारदार शस्त्राचा धाक दाखवून तसेच प्रसंगी खूनी हल्ला करून नागरीकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करीत होता.
या घटनेची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. यापार्श्वभूमिवर पोलिस आयुक्तांनी गुरूवारी (दि.२९) त्याच्यावर स्थानबंध्दतेची कारवाई केली असून, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात त्याची रवनागी करण्यात आली.