नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाळूने भरलेल्या डम्परने धडक दिल्याने ७६ वर्षीय स्कुटीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सिटीसेंटर मॉल परिसरात शनिवारी सायंकाळी घडला. या अपघातात मृत स्कुटीस्वाराची पत्नी बालंबाल बचावली. याप्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी सेंटर मॉलकडून एबीबी सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. वाळूने भरलेल्या डम्परने स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक दिलीप हनुमंत भावे (७६ ,रा. कामटवाडे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या मागे बसलेल्या पत्नी रश्मी या थोडक्यात बचावल्या. दुचाकी चालकाने हेल्मेट परिधान केलेले होते.
सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल या रस्त्यावर शनिवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक होती. ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शन, मॉल मध्ये खरेदीसाठी असलेली गर्दी त्याशिवाय नियमित रस्त्यावरील वाहतूक यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या खुप रांगा होत्या. अशातच हा अपघात झाल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
या दुर्देवी अपघातानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकी चालक हे लष्करातून सेवानिवृत्त झालेले आहेत. गेल्याच वर्षी नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात त्यांची वयाची ७५ साजरी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाचा नाशिक शहरात केटरिंग व्यवसाय आहे.
Nashik Road Accident one Death Crime Truck Dumper