नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती झाल्यानंतर नागरी प्रश्नांवर त्या प्रभावीपणे काम करतील अशी अपेक्षा होती. पण, सहा महिने उलटूनही त्यांना शहरातील सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फारसा वेळ मिळत नसल्याचे आता समोर आले आहे. केवळ बैठका व अधिका-यांना सुचना त्या देत असल्या तरी ग्राऊंडवर मात्र त्याची अमंलबजावणी होते की नाही हे त्या बघत नसल्यामुळे प्रश्न कायम आहे. आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देऊन फोटोसेशन करुन घेतले. त्यातून त्यांना प्रसिध्दी मिळाली. पण, प्रश्न काही सुटले नाही.
नाशिक शहरातील रस्त्यांचा प्रश्न तीव्र आहे. त्यात झालेला गैरव्यवहारही काही दिवसातच पावसाने उघड केला. त्याची चौकशी तर सोडा पण त्यावर नवीन आयुक्तांनी साधा ब्र सुध्दा काढला नाही. आता याच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे झाले असून वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप आहे. व्दारका येथील माणेकक्षा नगर येथील नव्या रस्त्यावर पाईलपलाईनसाठी खड्डे खोदले. त्यानंतर त्याची वरवर डागडुगी करुन ते भरुन फक्त खडी टाकली. त्यानंतर या रस्त्याची अवस्था आता बिकट झाली आहे. वर्षभरानंतरही हे काम झाले नाही.
व्दारकाकडे जाणारी बहुतांश वाहतुक या सिंगल रस्त्यावरुन होत असल्यामुळे येथे वाहनांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे येथून अर्ध्या रस्त्यावरुन वाहने नेणे हे वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याप्रमाणेच शहरातील इतर रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. आता पावसाळा असल्यामुळे मनपा या रस्त्यावर फक्त भराव टाकेल. ती दुरुस्त करणार नाही. त्यामुळे वाहनधारकांनी आता या रस्त्यावर सेल्फी काढून आयुक्तांना पाठवून मोहिम सुरु करावी तरच या रस्त्याची अवस्था त्यांच्यापर्यंत पोहचेल.