नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला गुरुवारी (दि.३१) दुपारी लागलेल्या आगीने भीषण स्वरूप घेतल्याने प्रेस प्रशासनासह या नेहरूनगर भागातील रहिवाशांची चांगलीच धावपळ उडाली. या आगीत करन्सी नोट प्रेसचे स्क्रप साहित्य भस्मसात झाले. प्रेसच्या मोकळ्या जागेत ही आग लागल्याची घटना घडली असली तरी या घटनेने करन्सी नोट प्रेसच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे.
नेहरूनगर भागातील प्रेसच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरील वाळलेल्या गवताने दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक पेट घेतला. काही क्षणातच धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावातांना दिसू लागल्याने मुख्य रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. प्रेसच्या सुरक्षा कर्मचा-यांनाही या घटनेची माहिती मिळताच तत्काळ आग विझविण्यासाठी प्रेसची आवश्यक कुमक घटनास्थळी दाखल झाली. धुराचे लोट आणि भडकलेली आग दूरवरून दिसत असल्याने नेहरूनगर भागातील रहिवाशांत देखील काही काळ भीतीचे वातवरण तयार झाले. या आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने या भागात करन्सी नोट प्रेसचे पडलेले मोठ्या प्रमाणातील स्क्रप साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्रेस आणि पालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंबांच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिकस्तीने या आगीवर नियंत्रण मिळवले. उन्हाच्या तीव्रतेने वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने हि आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्य रस्त्याला परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वाळलेल्या गवताच्या प्रश्नाकडे प्रेस प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष करता कामा नये, ही बाब या आगीच्या घटनेतून अधोरेखित झाली आहे.