नाशिकरोड – नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ११ घरफोड्या केलेल्या अट्टल गुन्हेगारांकडून एक किलो सोने, अर्धा किलो चांदी व इतर मुद्देमालासह एकूण ५० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या घरफोड्यातील आरोपी शंकर श्यामराव कापसे (वय ३२, रा. मु. पो. वडावली, अंबरनाथ, जि. ठाणे, मु. पो. कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक), अफजल हुसेन सय्यद (वय २५, रा. भगूर, नाशिक), विकी ऊर्फ विकास सुधाकर पटेकर (वय २७, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, महात्मानगर, नाशिक), राजेश शंभूप्रसाद गुप्ता (वय ३०, रा. जगताप मळा, मुक्तिधाममागे, नाशिकरोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शंकर कापसे हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कापसे हा अंबरनाथ परिसरात व्याजाने पैसे वाटत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. १८ डिसेंबर रोजी पवारवाडी-सायखेडा रोड येथे घरफोडी झाल्याची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तसेच जेलरोड, शिक्षक कॉलनी, मराठा कॉलनी, अयोध्यानगर, ब्रिजनगर, भगवा चौक अशा सहा ठिकाणी घरफोडी झाल्याचे गुन्हे दाखल होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना, तसेच गुन्हे शोध पथकाचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.