नाशिकरोड – वीज क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. सरोज बाबुलाल आहिरे व चंद्रपूरच्या आ. प्रतिभा धानोरकर यांनी मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे दालनात बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम जाधव, भीमाशंकर महंता व महानिर्मितीचे अनंता कोर आदी उपस्थित होते. या बैठकीत लवकरच भरती प्रक्रिया राबवावी. प्रकल्पग्रस्त, प्रकल्प कुशल, प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक व ट्रेनींगच्या आधारावर प्रश्नपत्रिका काढण्याच्या सुचना परीक्षा घेणाऱ्या संस्थेला देण्यात याव्यात. पाच वर्षे प्रशिक्षण पूर्ण झालेल्याना ट्रेड टेस्ट घेऊन तंत्रज्ञाची भरती करण्यात यावी. ज्या प्रशिक्षणार्थींचे वय ४५ वर्षे पूर्ण झालेले आहे व जे प्रशिक्षणार्थी अकुशल आहे. अशांना चतुर्थ श्रेणी अंतर्गत सेवेत सामावुन घेण्यात यावे अशा विनंतीवजा मागण्या आ. सरोज आहिरेंनी बैठकीत केल्या. तसेच प्रशिक्षणार्थीना कौटुंबिक आरोग्य विमा संरक्षण देण्याचा मुद्दा आ. सरोज आहिरे यांनी अतिशय पोट तिडकीने या बैठकीत मांडला. अपघात झाल्यास विमाकवच नसल्याने त्या प्रशिक्षणार्थीवर आर्थिक संकट कोसळते असेही त्यांनी सांगितले. तेव्हा ना. तनपुरे यांनी मुख्य अभियंत्यांना अशा अपघाती प्रशिक्षणार्थींना तात्काळ मदत करण्याच्या सुचना केल्या. पुढील बोर्ड मिटींग मध्ये ऊर्जा मंत्र्यांच्या समवेत या मागण्यांवर विचार केला जाईल असेही ना. तनपुरे म्हणाले. आ. सरोज आहिरे यांनी एकलहरा येथील प्रशिक्षणार्थीना दिलेल्या आश्वासनानंतर हा पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या बैठकीस कोटमगाव सरपंच बाळासाहेब म्हस्के, सोसायटी चेअरमन पोपटराव म्हस्के, रामकृष्ण म्हस्के, शंकर म्हस्के, श्रीपत म्हस्के, प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीचे प्रतिनिधी संदीप म्हस्के, किरण पेखळे, समाधान लोणे, मनोज नेहे, राहुल सहाणे, अजिंक्य बोराडे आदी उपस्थित होते.