नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एक दुःखद घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थिनीला अचानक चक्कर आले. ती खाली कोसळली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, तिची प्राणज्योत मालवली. यादुर्घटनेमुळे जातेगाववर शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. त्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (वय १५, इयत्ता नववी) ही प्रभात फेरी दरम्यान “वंदे मातरम, भारत माता की जय” अशा घोषणा देत होती. त्याचवेळी तिला चक्कर आले. आणि ती जमिनीवर कोसळली. तिला उपचारासाठी तात्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी सांगितले. त्यामुळे पुजा हिला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, नांदगावला घेऊन जात असतानाच पूजाचे निधन झाले.
पुजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला जन्मापासूनच श्वासोच्छवास घेण्यास त्रास व्हायचा. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला छिद्र असल्याचे दिसून आले. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतू शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिचे निधन झाले. याघटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. तिच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत १२ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम वरील घटनेमुळे रद्द करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
Nashik Republic Day Prabhat Feri Student Girl Death
Nandgaon Jategaon