नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या आणि आल्हाददायक हवामानामुळे राहण्यासाठी पसंती मिळत असलेल्या नाशिक शहरात सध्या रिअल इस्टेट क्षेत्राला सुगीचे दिवस आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच येत्या दोन वर्षात नाशिक शहरामध्ये तब्बल ९० हजार घरे उपलब्ध होणार असल्याची बाब समोर येत आहे. परिणामी, नाशिकच्या अर्थव्यवस्थेला रिअल इस्टेट क्षेत्र मोठी चालना देतानाच मोठा रोजगार निर्माण करणार आहे.
गेल्या दशकभरात नाशिकच्या रिअल इस्टेट व्यवसायाची गती काहीशी मंदावली होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे आता पुन्हा नाशिकचे रिअल इस्टेट क्षेत्र भरारी घेत आहे. नव्याने लागू झालेले नियम, विकास नियंत्रण नियमावली, प्रिमिअम शुल्कातील सूट, पुनर्विकासाच्या नियमातील सूसूत्रता, गृहकर्जाची सुलभ प्रक्रिया अशा विविध कारणांमुळे बांधकाम क्षेत्राला मोठीच चालना मिळत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात नाशिकमध्ये विविध गृह विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. नाशिक शहराचे पालकत्व असलेल्या नाशिक महापालिकेमध्ये बांधकाम प्रकल्पांच्या मान्यतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहेत. तब्बल ९ कोटी चौरस फुटाच्या बांधकाम प्रस्तावांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये तब्बल ९० हजार घरे उपलब्ध होणार आहेत. पुढील दोन वर्षात हे गृहप्रकल्प पूर्ण होणार आहेत. या गृह प्रकल्पांमुळे तब्बल साडे तीन लाख लोकसंख्येला आवश्यक असलेल्या घरांचा पुरवठा होऊ शकणार आहे.
नाशिक शहराला येत्या दोन दशकात तरी हद्दवाढीची गरज नाही. कारण, सध्याच्या हद्दीत बांधकाम आणि विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यातच नाशिकच्या आल्हाददायक हवामान आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या उत्तम जाळ्यांमुळे नाशिकला वास्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. किंबहुना निवृत्तीनंतर नाशकातच स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. शहराच्या सर्वच भागात बांधकाम प्रकल्प साकार होत आहेत. त्यामुळे केवळ एका भागापुरता विकास मर्यादितराहिलले नाही. ही बाबही शहरासाठी पोषख ठरत आहे.
ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे म्हणाले की, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास अशी नाशिक शहराची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये वास्तव्य करण्यासाठी असंख्य जण पसंती देत आहेत. कम्युनिटी लिव्हिंगलाही प्राधान्य दिले जात असल्याने नाशकात मोठ्या गृह प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर नाशिकचे रिअल इस्टेट क्षेत्र अतिशय पोषक वातावरणात असल्याचे दिसून येत आहे.
पुनर्विकासाला चालना
शहरात गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या सोसायट्या आणि गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग सध्या मोकळा होताना दिसत आहे. त्यामुळेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोसायट्यांपासून इतर भागातील गृहसंकुलांचा पुनर्विकास येत्या काळात होणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात संतुलित आणि सुनियंत्रित असे गृहप्रकल्प पहायला मिळणार आहेत. एफएसआय चांगला मिळत असल्याने सहाजिकच पुनर्विकासाला मोठी चालना मिळत आहे.