नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात शालेय पोषण आहाराच्या तांदळाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बचत गटाच्या महिलांच्या धाडसामुळे लाखो रुपयांचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. पंचवटी भागात ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारात तांदळाचे वाटप केले जाते. या तांदळाचा मोठा काळाबाजार होत असल्याची माहिती बचत गटाच्या महिलांना मिळाली. त्यांनी ती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचवटीतील एका खासगी गोडावूनवर छापा टाकला. शालेय पोषणा आहाराच्या तब्बल सात ते आठ लाख रुपयांच्या तांदळाच्या गोण्या येथे आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी हा तांदूळ जप्त केला आहे. हा तांदूळ जिल्ह्याच्या विविध भागात विकला जाणार असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत. तर, मोठ्या धाडसाने हा साठा पकडून देणाऱ्या बचत गटाच्या महिलांचे पोलिसांनी कौतुक केले आहे. तसेच, परिसरात या महिलांची चर्चा होत आहे.