नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालवण येथील पुतळा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची दररोज साफसफाई करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मालवण येथील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, सदरचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. नाशिक शहरातील विविध भागात देखील महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एकदा पुतळे बसविण्यात आल्यानंतर त्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही. तसेच पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष केलं जात. फक्त जयंती आणि पुण्यतिथीला क्वचित पुतळ्याची स्वच्छता होते. त्यानंतर वर्षभर पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे शहरातील अनेक पुतळे धुळखात पडून आहेत. उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांमध्ये विविध समुदाय, समाज व संघटनांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे पुतळा ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. महापुरुषांचे पुतळे आपल्या इतिहासाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांचे सुरक्षितता व ते दीर्घकालीन चांगले राहतील याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर पुतळे स्वच्छ राहतील याची ही काळजी घेतली पाहिजे.
नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात पुतळे उभारण्यात आले आहे. अनेक चौकात व मोक्याच्या ठिकाणी हे पुतळे उभारण्यात आले आहे. हे पुतळे केवळ पुण्यतिथी आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी सजवले जातात. त्या विशेष प्रसंगांसाठी रंगरंगोटी आणि साफसफाईचे कामे केली जातात. आणि त्यानंतर विशेष प्रसंग येईपर्यंत वर्षभर या पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये, याची अगोदरच काळजी घेण्यासाठी नाशिक मधील सर्व पुतळ्यांची दररोज साफसफाई करून लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सुचना संबधितांना देण्यात याव्या असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, व्यंकटेश जाधव, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, भालचंद्र भुजबळ, रेहान शेख, रविंद्र शिंदे, प्रदीप माळी, हरिष महाजन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.