नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांना याबाबत मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
प्रभागातील गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा आदी भागात प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे दररोज अपघात होवून नागरिक जखमी होत आहेत. नागरिकांचे जीव धोक्यात आले असून, कंबरदुखीचे आजार बळावत आहेत. खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर यांच्या पुढाकाराने महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), दत्तात्रय वाघ, मनोज वाणी, सर्जेराव पवार, रोहित शेंदुर्णीकर यांच्यासह नागरिक हजर होते. पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी रस्त्यांची पाहणी करण्यात येईल, तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे यांनी सांगितले.









