जगदीश देवरे, नाशिक
कर्णधार कुणाल पांड्याचे कुशाग्र डावपेच, अतित शेठ या बडोद्याच्या अनुभवी मध्यमगती गोलंदाजाने आणि त्याच्या सोबतीला राज लिम्बानी या अवघ्या १९ वर्षीय नवख्या गोलंदाजाने दाखविलेली चुणूक यामुळे नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरु असलेल्या रणजी सामन्यात पहिल्या दिवशी बलाढ्य बडोदा संघाविरुध्द पहिल्या डावात महाराष्ट्राला फार मोठी धावसंख्या उभारता येेते की नाही? ……१५० च्या आसपास संघ बाद होतो की काय?अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, मधल्या फळीत २३ वर्षीय अष्टपैलु सिध्देश वीर (४८ धावा) याची तडाखेबंद फलंदाजी आणि मौके पे चौका मारत यष्टीरक्षक फलंदाज सौरभ नवलेने (नाबाद ६० धावा) केलेली दमदार फलंदाजी यामुळे महाराष्ट्र संघाची स्थिती काहीशी मजबुत झाली आहे. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा पहिल्या डावात महाराष्ट्राच्या ७ गडी बाद २५८ धावा फलकावर लागल्या आहेत.
सरासरी थंड हवामान असलेल्या नाशिकच्या नवीन खेळपट्टीवर सकाळी दव दिसून आल्याने खेळपट्टीत सुरूवातीचे काही तास नक्कीच ओलावा राहील हे चाणाक्ष कुणालने ओळखले. आपल्या मध्यमगती गोलंदाजांना स्विंग मिळेल हे ओळखूनच नाणेफेक जिंकल्यानंतर कुणालने महाराष्ट्र संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रीत केले होते. परंतु कुणालचे अंदाज खोटे ठरवीत महाराष्ट्राच्या डावाची सुरूवात मात्र उत्तम झाली होती. नाशिकचा खेळाडू मुर्तूझा ट्रंकवाला आणि पवन शाह या दोघांनी नाबात ३९ धावांची चांगली सुरूवात महाराष्ट्राला करून दिली. परंतु त्यानंतर डावाच्या ११ व्या षटकात पवन आणि १२ व्या षटकात मुर्तुजा बाद झाल्यानंंतर संघाला मोठा झटका बसला. त्यानंतर काही अंतराने कर्णधार ॠतुराज गायकवाड हा देखील अवघ्या १० धावा काढून बाद झाल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. परंतु, मधल्या फळीतले सिध्देश वीर (४८ धावा), यश क्षिरसागर (३० धावा) नाशिकचे जन्मस्थळ असलेल्या रामकृष्ण घोष (२६ धावा) यांनी संघाला थोडासा आधार देत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला आणि सौरभने त्यावर कळस चढवत एका समाधानकारक धावसंख्येकडे संघाची वाटचाल सुरू केली.
देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सौरभ नवलेचा उदय होवून फार दिवस झालेले नाहीत. २०२२ च्या अखेरीस २५ वर्षीय सौरभने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या तरूण खेळाडूने आज नाशिकचे मैदान गाजवले. अगदी काही दिवसांपुर्वीच मेलबोर्न कसोटीत नितीश रेड्डी या नवख्या फलंदाजाने आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघासाठी ज्या जबाबदारीने मधल्या फळीत फलंदाजी करुन संघाला सावरले होते होती, काहीशी त्याचीच आठवण आज सौरभची फलदांजी बघतांना झाली. बडोद्याच्या गोलंदाजांसाठी तो डोकेदुखी ठरला. सौरभने तळाच्या फलदाजांना हाताशी धरून आपल्या संघाची धावसंख्या २५० पार नेली आहे. ८ चौकारांच्या मदतीने केलेले त्याचे अर्धशतक हे आजच्या दिवसाचे एकमेव वैशिष्टय ठरले असे म्हणावे लागेल. सुरूवातीला फटकेबाजी केल्यानंतर सौरभने शांत आणि संयमाने फलंदाजी केली हे विशेष. एक बाजू लावून धरण्यासाठी त्यांने नंतर एकेरी धावांवर जास्त भर दिला आणि आपली विकेट राखून ठेवली. १२५ चेंडूत त्याने नाबाद ६० धावा केल्या आहेत.
त्याआधी २०२१ चा आयपीएल सिझन गाजवणा-या कर्णधार ॠतुराज गायकवाडने मात्र मैदानात सामना बघण्यासाठी उपस्थित असलेल्या नाशिककरांची निराशाच केली. महे्ंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडल्यानंतर या संघाच्या कर्णधारपदाची धुरा ॠतुराजच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. इतक्या नामवंत फलंदाजाची कामगिरी बघण्यासाठी प्रेक्षक खरेतर आतूर होते. परंतु, पॉईन्टच्या दिशेने एक आणि कव्हरच्या दिशेने दुसरा सणसणीत चौकार मारण्याखेरीच ॠतुराजची कामगिरी चमकलीच नाही.
आता उद्या सामन्याच्या दुस-या दिवशी बडोद्याचा संघ सर्वप्रथम सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघाचे उर्वरीत फलंदाज बाद करुन त्यानंतर आव्हानादाखल मिळालेल्या धावसंख्येला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चार दिवस चालणा-या या सामन्यात पहिल्या डावात बडोद्याला आघाडी मिळते की त्यात काही बिघाडी होते हे चित्र उद्या स्पष्ट होईल आणि यात कर्णधार कुणाल पांड्याची फलंदाजीतली कामगिरी हा नाशिकच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहील.