नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा यासाठी कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यात १४ व १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या खरेदी कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्मा चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले आहे.
मानवी आरोग्यामध्ये सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. जंगलात तसेच शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगविल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यात शरीरास आवश्यक असणारे औषधी व पौष्टीक घटक विपूल प्रमाणात आढळतात. या रानभाज्यांचा हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपासून ऑक्टोबर पर्यंत चालतो. यात करवंदे, गुळवेल, कडूकंद, चाईचा मोहर आणि सुरण, तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, घोळ, अळू, खुरसणी, तोडली व लोथ यांचा समावेश होतो. रानभाज्यांची उगवण नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढविणे काळाची गरज असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगला बाजार मिळेल, शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे योग्य भाव मिळतील व शहरी ग्राहकांना रानभाज्यांची ओळख होईल या दृष्टीकोनातून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्मा चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी कळविले आहे.
Nashik ranbhajya Festival atma government Department
Trible Farmer Vegetables