नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून गेली आहे. तर या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातही या पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक शहरात रात्रभर पाऊस होता. तो अजूनही सुरुच आहे. शहरात १० तासात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही धरणांच्या विसर्गात वाढ झाली आहे. दारणा, कादवा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर धराणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. गोदावरी दुथडी भरुन वहात आहे. रविवारी १८ धरणांमधून विसर्ग सुरु असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
बागलाण तालुक्यात मुसळधार पावासात गारणे गावात घराची भिंत कोसळली. यामध्ये वृध्देचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. अनेक भागात घराची पडझड झाली आहे. मालेगावमध्ये १० मेंढ्याचा मृत्यू झाला तर त्र्यंबकेश्वरमध्ये म्हैस वीज पडून गतप्राण झाली आहे. नांदगावमध्ये अनेक भागात दोन ते तीन तास मुसळधार पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर शाखांबरी नदीला पूर आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात झाड उन्मळून पडले आहे. रेल्वे फाटकावर गुडघाभर पाणी साचले आहे.
शनिवारी सांयकाळापासून जिल्हयात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंत हा जोर कायम होता. प्रशासनाने मदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात जोर धरला असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नाशिक महानगरपालिकेचा सतर्कतेचा इशारा
नाशिक शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचे पाणी व धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी, नंदिनी नदी व अन्य नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत सहाही विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नदीकाठच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच ठिकठिकाणी अनाउन्समेंटद्वारे “नदीकिनारी थांबू नये व सतर्क राहावे” असा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सर्वांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी सांगितले की, “सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठची पाणीपातळी वाढत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा न करता नदीकाठच्या परिसरात राहण्याचे टाळावे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.”नाशिक महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सर्व नागरिकांना विनंती करीत आहे की, नदी व नाल्याजवळ जाणे टाळावे. पावसाचे व नदीकाठच्या भागातील स्थितीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ महानगरपालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन सतत कार्यरत असून आवश्यक ते सर्व प्रतिबंधक उपाय करण्यात येत आहेत.
*येवल्यात मदतकार्य*
येवला तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीने मदतकार्य मिळण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या त्या गावात आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार सर्व गावामध्ये कार्यकर्ते पोहचून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ हेही तातडीने येवल्याच्या दिशेने रवाना झाले आहे.
नाशिक – क्युसेकमध्ये धरणाचा विसर्ग
दारणा – 12167
गंगापूर – 5328
वालदेवी – ८१४
आळंदी – 1263
होळकर ब्र.- 11210
भावली – 701
भाम – 1181
वाघाड – 1192
पालखेड – 23968
N M Weir – 36918
करंजवण- 12680
कडवा – 6752
तिसगाव- 166
गौतमी गोदावरी -1296
कश्यपी -1280
ओझरखेड-2899
पुणेगाव – ३८४०
मुकणे – 1520
वाकी – 1320