इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्हिजन नाशिक : भाग १२
क्वालिटी सिटी ऑफ इंडिया
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण “क्वालिटी सिटी उपक्रमासाठी देशातील पहिल्या पसंतीचे शहर म्हणून नाशिकची निवड करण्यात आली” हि बातमी वाचली असणार. आपणांस नक्कीच काही प्रश्न पडले असतील कि, क्वालिटी सिटी म्हणजे काय? ह्या उपक्रमासाठी नाशिकचीच निवड का करण्यात आली? चला जाणून घेऊया.
“कौशल भारत कुशल भारत” अर्थात ‘स्कील इंडीया’ या मोहिमेअंतर्गत ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि ‘नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ यांच्या मार्गदर्शनाखाली “क्वालिटी सिटी नाशिक” ही चळवळ राबविण्यात येणार आहे. देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून पुढे अन्य शहरांमध्येही तीचे अनुकरण केले जाऊ शकेल. या उपक्रमासाठी देशात ५ शहरांची निवड करण्यात आली असून त्या शहरातील पहिला सन्मान हा नाशिकला मिळाला आहे. या उपक्रमासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ समवेत नाशिक महानगर पालिका, नाशिक जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल आणि त्यासाठी शहरातील उद्योग, व्यापार, बांधकाम क्षेत्र, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील संघटनांना या चळवळीत सहभागी करून घेतले आहे.
नाशिक जिल्ह्यात कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण हे या चळवळीचे तीन प्रमुख उदिष्ट आहेत. ह्या उद्दिष्ट पूर्तीसाठी नाशिक मधील विविध संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. यात प्रामुख्याने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, आयमा, निमा, नाईस, नाशिक फर्स्ट, मी नाशिककर, असो ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनिअर्स, इस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नरेडको, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, केमिस्ट असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसीएआय, फिक्की, असोचेम, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, कॉम्प्युटर असोसिएशन, नीता, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, रिक्षाचालक संघटना, को- ऑप. बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, शासकीय/निमशासकीय विभाग यांचा समावेश आहे.
क्वालिटी सिटी ह्या उपक्रमासाठी नाशिक ची निवड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला प्रथम क्रमांकावर आणणे, शहराला लागून असलेल्या पाच गावांचा आदर्श गाव म्हणून विकास करणे, हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास, महिला बचत गटांना जोडणे, औद्योगिक कामगारांना वर्तणूक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, ग्रूमिंग, आरोग्य आणि स्वच्छता प्रशिक्षण, कचऱ्याचे पृथक्करण, विल्हेवाट जनजागृती, वृक्षारोपण, जलसाठ्याचे संवर्धन व जीर्णोद्धार करणे, हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारणे इत्यादी क्षेत्रांमध्ये ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ म्हणजेच आपल्या शहरासोबतच नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे. गुणवत्तेद्वारे समृद्धीला चालना देण्याचे हे एक ध्येय आहे. कौशल्य विकास योजनेद्वारे युवकांना प्रशिक्षण देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यात मदत करणे, उत्पादकता वाढविणे, दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि युवकांमधील क्षमतेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या कलागुणांचा विकास करणे आणि त्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते इतके सक्षम होऊन स्वत:चा रोजगार निर्माण करू शकतील आणि इतर तरुणांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील. यामुळे आपल्या देशाच्या औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासात खूप मदत होईल.
आपले नाशिक, ‘मुंबई, पुणे आणि नाशिक’ ह्या सुवर्ण त्रिकोणामधील तिसरे आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर आहे. मुंबई, ठाणे, पुणे नंतर नाशिकचे ‘सकल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. नाशिक हे धार्मिक शहर असूनही, औद्योगिक प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. आपल्या नाशिक मधील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये साधारण पाच हजारांहुन अधिक उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. औद्योगिक वसाहती मधील इंडस्ट्रीज मध्ये कुशल मनुष्यबळाची नेहेमी कमतरता असते. नाशिक सर्व शिक्षण आणि सामाजिक संस्थांनी उद्योजकां सोबत करार करून इंडस्ट्रीच्या गरजे नुसार कुशल मनुष्यबळ घडविणे अत्यंत आवश्यक आहे.
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) ह्या उद्योजकांच्या संघटनेने आणि ‘सिम्बॉयाेसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट’ च्या सहकार्याने “एक्स्पोर्ट मॅनेजर प्रोग्राम” हा अभ्यासक्रम विशेष करून उद्योजकांना निर्यातीबाबत सखोल ज्ञान व्हावे, निर्यातीला अधिक चालना मिळावी आणि निर्यात क्षेत्रात नाशिक जागतिक नकाशावर यावे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरु केलेला आहे आणि त्याला उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्या इएसडीएस कंपनीने देखील संदीप विद्यापीठा सोबत करार करून “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अडवान्सड क्लाऊड कॉम्पुटिंग” आणि “बी.टेक. इन क्लाऊड टेकनॉलॉजि अँड इन्फॉर्मशन सेकुरीटी” हे इंडस्ट्रीच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानवर आधारित विशेष अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत आणि त्याला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
नाशिकमध्ये येणारा पर्यटक हा केवळ धार्मिक पर्यटनासाठी येत नाही तर कृषी पर्यटन, वाईनरी पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिजम), आरोग्य किंवा वैद्यकीय पर्यटन, साहसी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन इत्यादी विविध कारणांनी नाशिकला वर्षभर भेट देत असतो. आपल्या संस्कृती मध्ये नदीला मातेचे स्थान दिलेले आहे, जीवनदायिनी (दक्षिण गंगा) गोदावरी नदीचा उगम आपल्या त्र्यंबकेश्वर (नाशिक) मध्ये असून ती नेहेमी अविरल आणि निर्मल वाहती असावी हि भाविकांची आणि पर्यटकांची साधी अपेक्षा असते. ज्या नदीला आपण जीवदायिनी किंवा माता मानतो तिची पवित्रता आणि स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्या दृष्टिकोनातून सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, नागरिकांचे प्रबोधन करणे, ‘स्वच्छतादूत’ हि चळवळ नियमितपणे राबवणे अत्यंत गरजेचे आहे.
नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मान्यताप्राप्त संस्थांकडून अधिकृत शिक्षण घेतलेल्या टुरिस्ट गाईड्स उपलब्ध असणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण म्हणजे स्थानीय इतिहास आणि परिसराची इत्यंभूत माहिती, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, देशी-विदेशी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे. ह्या व्यतिरिक्त सार्वजनिक वाहतूक क्षेत्रांमधील रिक्षा आणि टॅक्सी वाहन चालक, कर्मचारी यांचे साठी देखील संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सुरक्षित प्रवास, स्वच्छता इत्यादी गोष्टींचे कौशल्य विकास शिक्षण आवश्यक आहे.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने १५ जुलै २०१५ रोजी प्रथमच जाहीर केलेल्या ‘जागतिक युवा कौशल्य दिना’ च्या अनुषंगाने सुरू केलेला ‘स्किल इंडिया मिशन’ हा एक व्यापक कार्यक्रम आहे. स्किल इंडिया मिशन उपक्रमाचे उद्दिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे भारतीयांमध्ये औद्योगिक आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे, उद्योगाच्या गरजा आणि कौशल्य आवश्यकता यांच्यातील अंतर कमी करणे आहे. भारतातील ५४% लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. उच्च कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या, कुशल आणि शिक्षित मनुष्यबळाचा विकास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.
५०% पेक्षा जास्त लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत, कृषी क्षेत्राची परिणामी उत्पादकता खूपच कमी आहे. त्यामुळे तरुण पिढी रोजगारासाठी दुय्यम आणि तृतीयक क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. असंगठित क्षेत्रामधील श्रमिकांमध्ये कौशल्य विकासासाठी क्षमता निर्माण करणे व या निश्चित केलेल्या क्षेत्रात कौशल्य व अकुशल प्रशिक्षणाची संधी देणे फार गरजेचे आहे. अंतर्राष्ट्रीय श्रम संगठन नुसार, २०३० पर्यंत भारताला सुमारे २९ दशलक्ष कुशल कामगारांची कमतरता भासू शकते. उद्योग क्षेत्रामध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांना वेगवेगळी वेतनश्रेणी असतात. कौशल्याधारित प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि देशाची एकूण लोकसंख्या विचारात घेता ह्या क्षेत्रामधील आव्हान आणि संधीही किती आहे, हे लक्षात यायला हरकत नाही.
भारत जगाचे “स्किल कॅपिटल” बनण्यासाठी वचनबद्ध आहे. नाशिककरांनो आपण भारताची प्रथम क्रमांकाची “क्वालिटी सिटी” बनण्यासाठी वचनबद्ध आहोत का? हे काम कुठल्याही एका व्यक्तीचे किंवा एका संस्थेचे नाही. नाशिक मधील सर्व शासकीय-निमशासकीय, राजकीय-अराजकीय, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, व्यापारी, कर्मचारी संघटनांनी एकत्र आल्यास आणि एकाच उद्देशाने सकारात्मक कार्य केल्यास अशक्य नाही. नाशिककरांनो आपणास काय वाटते?
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी विशाल जोशी (सह लेखक)
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik Quality City of India Selection and after that by Piyush Somani