नाशिक- खा.गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नाशिक-पुणे प्रस्तावित नवीन रेल्वेलाईनच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या प्रस्तावित रेल्वेलाईनसाठी शेतक-यांकडील जमिनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे. या प्रकल्पाला राज्य आणि केंद्रशासनाने यापुर्वीच मान्यता दिलेली आहे. मात्र या प्रकल्पाला केंद्रशासनाची अंतिम मान्यता मिळालेली नसल्याने प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. नाशिक-पुणे रेल्वेलाईनचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आज खा.गोडसे यांनी संसदेत जोरदार आवाज उठविला. या प्रकल्पासाठी लागणा-या निधीपोटी राज्य आणि केंद्र शासन प्रत्येकी वीस टक्के तर साठ टक्के निधी इक्विलीटीमधून उभारण्यात येणार असल्याचा निर्णय यापूर्वीच झालेला असून अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रशासनाकडे प्रलंबित आहे. प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला तातडीने अंतिम मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी आज संसदेत केली आहे.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी खा.गोडसे यांनी आज संसदेत पुन्हा जोरदार आवाज उठवत केंद्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. नाशिक-पुणे या रेल्वेमार्गामुळे राज्यातील दोन मोठी शहरे एकमेकांना जोडली जाणार असून नाशिक-पुणे-मुंबई हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण पूर्ण होणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाला यापूर्वीच रेल्वेबोर्ड आणि रेल्वेमंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. प्रकल्पासाठी लागणा-या निधीपोटी राज्याने त्यांच्या वाटयाच्या वीस टक्क्यांच्या निधीला मान्यता दिलेली असून इक्विलीटीतून उपलब्ध होणा-या निधीचा प्रश्न निकाली निघालेला आहे. असे असले तरी या प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला अंतिम मान्यता कधी मिळणार असून सदर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आहे असा प्रश्न खा.गोडसे यांनी संसदेत मांडत या प्रस्तावाकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रकल्पास अंतिम मान्यता तातडीने द्यावी तसेच प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी संसदेत मांडली.देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे वाढावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. खा.गोडसे यांनी केलेली मागणी न्यायिक असून या मागणीवर आम्ही लवकरच चर्चा करून नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाविषयी सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
साडे सोळा हजार कोटी रुपये खर्च
मुंबई-पुणे याप्रमाणेच नाशिक-पुणे या दोन शहरांना लोहमार्गाने जोडून विकासाचा त्रिकोण साधण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून खा.गोडसे प्रयत्नशील आहेत. या प्रस्तावित प्रकल्पासाठी खा.गोडसे यांनी संसदेत आवाज उठवून प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळवून घेतलेली आहे. सदर लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी खा.गोडसे यांनी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. यातून या रेल्वेमार्गाचे आजमितीस सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. खा.गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे रेल्वेबोर्ड तसेच राज्य आणि केंद्रशासनाने नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सदर लोहमार्गासाठी साडे सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार असून पैकी राज्य शासन साडेतीन हजार कोटी व केंद्र शासन साडेतीन हजार कोटी रुपये निधी देणार असून सुमारे नऊ हजार कोटी रुपये निधी हा इक्विलिटीतून उपलब्ध होणार आहे.