मुंबई : महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे असून रेल्वे व्यवस्था देखील आहे. तसेच नाशिक – मुंबई दरम्यान देखील महामार्ग असून रेल्वे सेवा उपलब्ध आहे. मात्र नाशिक – पुणे या दरम्यान दरम्यान फक्त रस्त्यानेच वाहतूक शक्य असून अद्याप थेट रेल्वे मार्ग नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता नाशिक – पुणे रेल्वे मार्गाला गती मिळणार आहे.
नाशिककर आणि पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणता येईल, त्यामुळे दोन्ही शहराची कनेक्टिव्हीटी आणखीच आणखीच वाढणार असून औद्योगिक विकासाला आणि दोन्ही शहरांच्या प्रगतीला देखील गती मिळणार आहे. कारण नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी १०२३८ कोटींचे अर्थसहाय्य करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
नाशिक – पुणे दुहेरी मध्यम अतिजलद रेल्वे मार्गासाठी पुढील ११ वर्षांत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे राज्य शासनाने ठरवले असून, त्याबाबतच्या मान्यतेचा आदेश काढण्यात आला असून
केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी हे या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदार असतील . सुमारे २३० किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली जाणार आहे.
प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरावा, यासाठी या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी ६१५ कोटी आणि त्यात दरवर्षी ८ टक्के वाढ, असे करत अकराव्या वर्षी १,३२८ कोटी इतका निधी राज्य शासन स्वत:च्या आर्थिक स्रोतांमधून देणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
कसा असेल पुणे – नाशिक रेल्वेमार्ग :
– रेल्वेमार्गावर असतील २४ रेल्वेस्थानके, १८ बोगदे असतील.
– हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधून जाईल.
– यात आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर या औद्योगिक केंद्रांना हा रेल्वे मार्ग जोडणार आहे.
– विशेष म्हणजे ताशी २०० किलोमीटर इतका या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा कमाल वेग असेल तर सरासरी वेग १४० किमी प्रतितास इतका राहील.
– या रेल्वे मार्गामुळे नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्याच्या तसेच त्यालगतच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल
– या तीनही जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे यांच्या देखील विकासाला हातभार लागेल.