नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पळसे टोलनाक्यापासून काही अंतरावरच हा अपघात घडला आहे. पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला. ही पेटती बस बघून महामार्गावर एकच खळबळ उडाली. या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस काही वाहनांवर आदळली. त्यानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला. या गंभीर आपघातात बसने काही दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसे टोल नाक्याजवळून ही बस दुपारी १२ वाजेच्या सुमारास जात होती. राजगुरू नगर डेपोची असलेल्या या बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला. या पेटत्या बसने महामार्गावरील दोन दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या गंभीर धडकेत दुचाकीवरील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अन्य २ जणांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या एकूण ४ झाली आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. तत्काळ काही जणांनी पोलिस, टोल नाका आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. तातडीने अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बस राजगुरूनगर डेपोची आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन यासह विविध विभागांचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना तातडीने नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू आहे. बस अचानक का बिघडली याची काही माहिती मिळू शकलेली नाही, बसमधील प्रवासी सुखरुप असल्याचे सांगितले जाते. दुचाकीवरील मृत व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
Nashik Pune Highway ST Bus Fire Few Deaths
Accident