पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही तर पुणे-नाशिक किंवा नाशिक-पुणे प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, या प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. मात्र, आता खेड (राजगुरुनगर) येथील बायपास खुला झाला आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने खेड (राजगुरुनगर) येथील बायपास वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा बायपास दोन जिल्ह्यांना (पुणे आणि अहमदनगर) जोडणाऱ्या महामार्गालगतचा आहे. एकूण ४.९ किलोमीटर लांबीला हा बायपास आहे. या बायपासमुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ रस्त्याने किमान ३० मिनिटांनी कमी होणे अपेक्षित आहे.
पुणे ते नाशिक दरम्यानचे २१२ किमीचे अंतर साधारणपणे ४.५ तासांत कापले जाते. आणि काहीवेळा हे अंतर कापण्यासाठी तब्बल ६ तासही लागतात. त्याचे मुख्य कारण आहे ते खेड शहरातून जाणारा अरुंद मालवाहतूक मार्ग. याच रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. महामार्गालगत राज्य बस वाहतूकही आहे. यामुळे वाहतुकीची अनेकदा प्रचंड कोंडी होते. या महामार्गावरुन जाणारी अवजड वाहने आणखीनच समस्या वाढवतात. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनांना अतिरिक्त ३० ते ४५ मिनिटे लागतात. अनेकदा सर्वाधिक रहदारीच्या वेळेत अवघ्या ५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात किमान १० पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. तरीही वाहतूक कोंडी कायम राहते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२० मध्ये खेड बायपासचे बांधकाम सुरू केले होते. आणि दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता या बायपास खुला झाला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गालगतच्या नवीन बायपासमुळे दोन जिल्ह्यांमधला प्रवासाचा वेळ तर कमी होईलच, शिवाय प्रवासही सुकर होईल.
Nashik Pune Highway Khed Bypass Open Now