सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकहून प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसला नाशिक – पुणे महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी बचावले. पण, या दुर्घटनेत प्रवाशांच्या सामानासह बस जळून खाक झाली आहे. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली वाहन वाहतूक पूर्ववत केली.
नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन ही लक्झरी बस निघाली होती. स्लीपर कोच असल्यामुळे ३० ते ३५ प्रवासी या बसमध्ये होते. शिंदे पळसे येथील टोलनाका सोडल्यानंतर बस मोहदरी घाटात आली. याच वेळी गाडीच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व प्रवासी गाडीतून बाहेर पडले. मात्र काही प्रवाशांचे सामान हे गाडीच्या डिकीत होते, तर काहींचे बर्थमध्ये राहिले होते. बघता-बघता एसीमध्ये शोर्टसर्किट झाले अन संपूर्ण बसला आगीने वेढा घातला. काही क्षणातच बसचा केवळ सांगाडा उभा राहिलेला दिसून आला.








