सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात अपघात झाला आहे. या अपघातात चास येथील विद्यार्थिनी ठार झाली आहे तर अन्य दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. शनिवारी (28 मे) सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी अनिल खैरनार (वय 20, रा. चास, ता. सिन्नर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये सविता सूर्यभान सांगळे (20 रा. सोनेवाडी, ता. सिन्नर) आणि वर्षा सुभाष जगताप (20, रा. कासारवाडी, ता. सिन्नर) यांचा समावेश आहे. या दोघींवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चास, कासारवाडी व सोनेवाडी येथील रहिवाशी असलेल्या साक्षी, सविता आणि वर्षा या विद्यार्थिनी संगमनेर येथे सीईटीच्या क्लासला दुचाकीवरुन जातात. हा क्लास संपवून ऍक्टिव्हा स्कुटीने (क्र.एमएच-15, एचएल-1419) त्या घराकडे परतत होत्या. नांदूरशिंगोटे शिवारात खंडोबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर (क्र.एचआर.61 डी-9843) या विद्यार्थिनींची भरधाव दुचाकी धडकली. त्यात साक्षी खैरनार हिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी सविता सांगळे व वर्षा जगताप या विद्यार्थिनींना संगमनेर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले.
या तिन्ही विद्यार्थिनींनी नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी त्यांनी संगमनेर येथे सीईटीचा क्लास लावला आहे. क्लास सुटल्यानंतर तिघी एकाच दुचाकीवर घराकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.